Amit Shah Visit Mumbai : राज्यात काही महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून सर्व विधानसभा मतदारसंघात आपली ताकद आजमावण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. याच पार्श्वभूमीवर काल मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. ते रविवारी मुंबईत दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत काल महायुतीची महत्वाची बैठक पार पडली, या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
रविवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर अमित शाह यांनी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी मातृभाषेबाबत महत्वाचं भाष्य केलं. ‘घरात मातृभाषेमधून बोललं पाहिजे असं आवाहन करत बॉम्बे नको तर मुंबई नाव हवं अशी मागणी करण्यांमध्ये मी देखील होतो’, असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. त्यांच्या याच वक्तव्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.
नेमकं काय म्हणाले अमित शाह काय ?
“माझ्या घरातही दोन माझे नातवडं आहेत. त्यांनी संस्कृत किंवा गुजराती भाषा शिकावी, यासाठी मी त्यांना वेळ देतो. तसेच त्यांच्या शाळेत जाऊनही चर्चा करत असतो. त्यांच्या शाळेचे शिक्षक भाषा आणि भाषेचं व्याकरण व्यवस्थित शिकवतात की नाही हे देखील पाहत असतो. मी आपल्या सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की, कमीत कमी आपल्या घरात तरी आपल्या मातृभाषेतून बोला. त्यामुळे आपल्या मातृभाषेला आपली मुले पुढे घेऊन जातील. अन्यथा एक दिवस असा येईल की देशात आपल्याला मोठ्या संख्येने वृद्धाश्रम काढण्याची वेळ येईल. याचं कारण म्हणजे घरामध्ये नातू मातृभाषेत बोलले नाही तर नातवाचं आणि आजोबाचं नातं कसं जोडणार? त्यामुळे मातृभाषा बोलणं गरजेचं आहे”, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले, “मुंबईसाठी ज्या लोकांनी आंदोलन केलं, मुंबई हेच नाव हवं, अशी मागणी ज्या लोकांनी केली होती, त्यामध्ये मी देखील होतो. तेव्हा बॉम्बे नको तर मुंबई नाव हवं, अशी मागणी मी देखील केली होती”, असं त्यांनी म्हंटल आहे.
पुढे, “आता यापुढे जे नवीन शैक्षणिक धोरण येईल, त्यामध्ये आम्ही मातृभाषा सक्तीची करणार आहोत. मग या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध देखील होऊ शकतो. हे देखील आम्हाला माहिती आहे. मात्र, तरीही आम्ही हा निर्णय घेणार आहोत”, असंही गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं.
आज अमित शाह लालबागच्या राजाचं राजाचे दर्शन घेणार आहेत. त्याआधी ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गणपती बाप्पांचे दर्शन घेणार आहेत नंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन दर्शन घेणार आहेत.