महाराष्ट्रात अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. ७ ऑगस्ट रोजी सर्वांनी बाप्पाचं जल्लोषात स्वागत केलं. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील बाप्पाचे आगमन थाटामाटात झाले.
दरवर्षी सर्व ठिकाणी गणपती बाप्पाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. देशात अनेक गणपतीची मंदिर आहेत. या काळात भाविक देशातील अनेक मंदिरांना भेट देऊन गणपतीचे दर्शन घेत असतात.
मुंबईमधील गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. मुंबईतील गणपती पाहण्यासाठी भाविक दरवर्षी गर्दी करतात. अशातच आता भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भविकांसाठी भारतीय रेल्वेकडून गणेशोत्सव स्पेशल टूर ठेवण्यात आली आहे. IRCTC चे हे पॅकेज 15 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. या खास पॅकेजमधून भाविकांना मुंबई आणि तिरुपतीला भेट देण्याची संधी मिळणार आहे.
मुंबई गणेश चतुर्थी टूर पॅकेज 12 सप्टेंबरपासून सुरू होणार असून ते 1 रात्र आणि 2 दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये दोन लोकांसोबत प्रवास करायचा असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 15900 रुपये तर तीन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 15800 रुपये असणार आहे.
मुंबई आणि तिरुपती टूर पॅकेजमध्ये कल्याण, लोकमान्य टिळक, मुंबई, पुणे, सोलापूर आणि ठाणे येथून प्रवास सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 7390 रुपये तर तीन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 7290 फी असणार आहे तसेच 6500 रुपये मुलांसाठी पॅकेज फी असणार आहे. 3 रात्री आणि 4 दिवसांचे हे टूर पॅकेज असून यामध्ये कॅबने प्रवास करण्यात येणार आहे.
दरम्यान, हैदराबाद आणि मुंबई टूर पॅकेज 12 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. टूर पॅकेज 4 रात्री आणि 4 दिवसांचे असून या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, पुणे आणि सोलापूर येथून हे पॅकेज सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 19200 रुपये तर तीन लोकांसोबत प्रवास करायचा असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 18500 रुपये असणार आहेत.