Kolkata Case Supreme Court Hearing : सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतल्यानंतर सोमवारी ९ ऑगस्ट रोजी याची सुनावणी झाली. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने सध्या या प्रकरणाची सुनावणी 17 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. या प्रकरणी CJI ने CBI कडून नवीन स्टेटस रिपोर्ट मागवला आहे.
सीबीआयतर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, तपास यंत्रणेने एम्सला फॉरेन्सिक नमुने पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानंतर CJI चंद्रचूड यांनी CBI ला पीडितेच्या मृत्यूची वेळ आणि त्यानंतर अहवालात केलेल्या ‘अनैसर्गिक मृत्यू’च्या नोंदीबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
दरम्यान, या घटनेच्या विरोधात गेल्या काही दिवसांपसू डॉक्टर संपावर आहेत. डॉक्टरांच्या या संपामुळे 23 जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.
ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, पश्चिम बंगाल सरकारतर्फे उपस्थित राहून, राज्याच्या आरोग्य विभागाने तयार केलेला स्टेटस रिपोर्ट सीजेआय डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सादर केला. या अहवालात डॉक्टर संपावर असल्याने 23 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
यानंतर सुप्रीम कोर्टाने डॉक्टरांना पुन्हा कामावर परतण्याचे आवाहन केले आहे, पुढे त्यांनी म्हंटले आहे की, जर तुम्ही कामावर पुन्हा रुजू झाला नाहीत तर आम्ही राज्य सरकारला कारवाई करण्यापासून रोखू शकत नाही.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने पीडितेचे सर्व फोटो सोशल मीडियावरून तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले आहेत. कोलकाता पोलिसांनी बलात्कार आणि हत्येच्या घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवण्यास 14 तास का उशीर केला, याचे कारण आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.