आगामी विधानसभा निवडणुकीच्या चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते असलेले अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत रविवारी रात्री मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीतील अनेक जेष्ठ नेते उपस्थित होते. रविवारी ही बैठक पार पडल्यानंतर सोमवारी अमित शाह यांनी अनेक नेत्यांसोबत मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.
मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, दीपक केसरकर, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे या नेत्यांची उपस्थिती होती. परंतु यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. मुंबईत असून सुद्धा अजित पवार हे अमित शाह यांच्यासोबत दर्शनास आले नाहीत यामुळे अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
शिंदे गटाच्या नेत्यांकडून अजित पवार यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत अशातच अजित पवार महायुतीमधून बाहेर पडणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. आता अमित शाह यांच्यासोबत मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतताना अजितदादा दिसले नाहीत त्यामुळे आता या चर्चाना जोर येऊ लागला आहे.
दरम्यान, सोमवारी होणाऱ्या वस्तू व सेवा कर कायदा परिषदेच्या बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार नाहीत. अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, अजित पवार हे मुंबई विमानतळावर अमित शाह यांना भेटणार आहेत.