पुढील दोन महिन्यात आगामी विधानसभा निवडणूका लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. सध्या राज्यात आनंददायी वातावरण आहे कारण सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाच आगमन झाले आहे. दरवर्षी पुणे, मुंबई या सारख्या शहरांमध्ये गणपती दर्शनासाठी गर्दी होत असते. अनेक कलाकार, राजकीय नेते मुंबई मधील गणपतीचे दर्शन घेत असतात.
नुकतेच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते असलेले अमित शाह यांनी मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेस गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. यानंतर आता भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.
लालबागच्या राजाचे दर्शन शरद पवारांनी घेणे म्हणजे ढोंगीपणा आहे असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले आहे. लालबागचा राजाच्या दर्शनाला मुख्यमंत्री असताना शरद पवार आलेले त्यानंतर आता ते 30 वर्षांनी दर्शनासाठी आले आहेत. असे म्हणत टोला लगावला आहे.
ते म्हणाले, “शरद पवार यांना हिंदुत्त्वाबाबत सुबुद्धी मिळो, माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे. शरद पवार यांच्यासमोर प्रभू रामचंद्र, विठुराया आणि हिंदुत्त्वाचा अपमान ज्ञानेश्वर महाराव यांनी केला. परंतु शरद पवारांनी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही यामुळेच आता लालबागच्या राजाने शरद पवार यांना निवडणुकीसाठी नौटंकी का होईना पण सुबुद्धी दिली असा हल्लाबोल त्यांनी पवारांवर केला.
दरम्यान, महाराष्ट्राच्या जनतेला ही ढोंगी श्रद्धा दिसून येत आहे, असे भाष्य देखील भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांविषयी केलेले आहे.