एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकांची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे तर आता दुसरीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांबद्दल मोठ विधान केले आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांइतक्याच इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती पुढील दोन वर्षांमध्ये होतील असे वक्तव्य त्यांनी यावेळी केलेले आहे.
ऑटोमोटिव्ह कम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे ६४ वे वार्षिक सत्र आज पार पडले. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीबद्दल भाष्य केले. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय लोक स्वीकारत आहेत. येत्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवरील खर्च कमी होणार आहे त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आता अनुदानाची आवश्यकता भासणार नाही असे विधान त्यांनी यावेळी केले आहे.
देशात दरवर्षी २२ लाख कोटी रुपये पेट्रोल-डिझेलवर खर्च होतो. अशा परिस्थितीत पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करायला हवं असं त्यांनी म्हंटल आहे, तसेच पुढे त्यांनी मी पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या विरोधात नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे, दरम्यान, पेट्रोल-डिझेल ऐवजी सीएनजी देखील उत्तम पर्याय आहे असे वक्तव्य त्यांनी केलेले आहे. बजाज सीएनजी या बाईकचे त्यांनी यावेळी उदाहरण दिलेले आहे.
बजाज सीएनजी बाईक अवघ्या एक रुपयात एक किलोमीटर धावते. पेट्रोलवर चालणाऱ्या बाइकला एक किमी अंतर पार करण्यासाठी दोन रुपयांहून अधिक पैसे लागतात. याचसोबत पेट्रोल-डिझेल ऐवजी इथेनॉल उत्तम पर्याय आहे. दरम्यान, वाढत्या इथेनॉल मागणीमुळे मक्याची किंमत देखील वाढली आहे आणि यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे असे देखील वक्तव्य त्यांनी यावेळी बोलताना केलेले आहे.