राज्यात आगामी विधानसभा निवडणूका नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच सर्व पक्ष आगामी विधानसभा निवडणूकीची जोरदार तयारी करत आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून अनेक नेते पक्षांतर देखील करत आहेत. सध्या राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन आघाडी आहेत परंतु आता तिसरी आघाडी देखील तयार होईल अशा चर्चा रंगताना दिसत आहेत.
छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष, राजरत्न आंबेडकर व माजी सैनिक, शेतकरी घटकपक्षांना एकत्रित येऊन तिसरी आघाडी स्थापन होऊ शकते अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनी मानवत तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत होते, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी तिसरी आघाडी निर्माण करण्याविषयी भाष्य केले आहे.
पत्रकारांनी त्यांना तिसरी आघाडी निर्माण होईल का? असा प्रश्न विचारला असता यावर त्यांनी उत्तर दिलेले आहे. आज आम्ही कोणत्याच राजकीय विषयावर चर्चा करणार नसून आम्ही नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यास आलो आहोत कारण शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यावेळी ते म्हणाले, राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी कम करत आहेत, तसेच बच्चू कडू देखील या कामात आहेत. असे वक्तव्य त्यांनी यावेळी बोलताना केले.
याचसोबत, आमचा हेतू समान असून या उद्देशानेच आम्ही एकत्र आलो आहोत असे भाष्य छत्रपती संभाजीराजे यांनी केले. अतिवृष्टी विषयी बोलताना ते म्हणाले की, परभणीचेच सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. 50 टक्के क्षेत्र यामध्ये खराब झाले असून यापुढे काय करायचे यावर चर्चा करणे गरजेचे आहे तसेच अतिवृष्टीमुळे जी घर पडली आहेत त्यांना घरकुलच्या माध्यमातून घर दिले पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केलेली आहे.
दरम्यान, कृषिमंत्री परळीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहेत. यावरूनच त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर देखील जोरदार हल्ला चढवला. पुढे बोलताना ते म्हणाले, अतिवृष्टीबाबत राज्य शासन गंभीर आहे, असं मला वाटत नाही. तसेच अतिवृष्टीसारखी भीषण परिस्थितीचा संवेदनशील विषय असताना सुद्धा कृषिमंत्री परळीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहेत यामुळेच आता अजित पवारांनी कृषिमंत्री काय करतात हे पाहावं, इकडे कृषी मंत्री म्हणायचं आणि दुसरीकडे धिंगाणा घालायचं, अशा शब्दांत त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.