US elections 2024 : अमेरिकेतील उपाध्यक्ष कमला हॅरिस (Kamala Harris) आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात बहुप्रतिक्षित अध्यक्षीय पहिली वादविवाद चर्चा आज पार पडणार आहे. दोघेही आपले म्हणणे देशासमोर मांडणार आहेत.या चर्चेनंतर या दोघांपैकी एकाचा व्हाईट हाऊसमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका ५ नोव्हेंबरला होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या या अध्यक्षीय चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी उमेदवारांमधील आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणाऱ्या चर्चेतून मतदार या उमेदवारांविषयीचे आपले मत बनवतात. बुधवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत (अमेरिकेच्या वेळेनुसार मंगळवारी रात्री ९ वाजता) हा वादविवाद प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
यापूर्वी 28 जून रोजी राष्ट्रपतीपदाची पहिली वादविवाद चर्चा झाली होती. यामध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आमनेसामने होते. या चर्चेत ट्रम्प यांना विजयी घोषित करण्यात आले. तेव्हापासून बऱ्याच गोष्टी बदललेल्या दिसून आल्या. त्यानंतर ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यानंतर वाढते वय आणि ढासळत चाललेली तब्येत यामुळे बायडेन यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाने कमला हॅरिस यांचे नाव पुढे केले. ज्या सध्या ट्रम्प यांना जोरदार स्पर्धा देत असल्याचे दिसत आहे.
जो बायडेन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत ट्रम्प यांनी अधिक तंदुरुस्ती आणि चतुराई दाखवली, तर बायडेन अनेकदा मुद्देसूद बोलतानाही अडखळले आणि गडबडले. त्यामुळे पहिल्या वादविवादात ट्रम्प यांचीच सरशी झाल्याची झाल्याचे दिसून आले होते. आता आज होणाऱ्या चर्चेत डोनाल्ड ट्रम्प का कमला हॅरिस बाजी मारतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
व्हाईट हाऊसच्या शर्यतीतून जो बायडेन बाहेर पडल्यानंतर 2020 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल असे चित्र दिसत असताना आता ते उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील उच्च-स्तरीय लढतीत बदलले आहे.निवडणुकीनंतर आपल्या पहिल्या महिला अध्यक्षांसह ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार का ट्रम्प यांच्या गळ्यात पुन्हा एकदा अध्यक्षपदाची माळ पडणार याची आता अमेरिकेला उत्सुकता लागली आहे .