आगामी विधानसभा निवडणुका नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीत अनेक नेते उमेदवारी मिळणार की नाही या चिंतेत आहेत. सर्व पक्षांमध्ये जागावाटपावरून बैठकांना सुरवात झाली आहे.विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपाबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी सोमवारी मुंबईमध्ये अनेक नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) आणि अजित पवार(Ajit Pawar) देखील उपस्थित होते.
अमित शाह यांनी या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीचे महत्व तिन्ही पक्षातील नेत्यांना पटवून दिलेले आहे. तसेच या बैठकीत विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा झाली आहे .जागा वाटपावरून वेगवेगळी चर्चा न करता तिन्ही पक्षातील जेष्ठ नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा अशा सूचना अमित शाह यांनी दिलेल्या आहेत. तसेच जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय दिल्लीत होईल असे देखील अमित शाह यांनी सांगितलेले आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या बैठकीबाबत माहिती दिलेली आहे. जागा वाटपाबाबतची चर्चा होत असून कोणाला किती जागा मिळतील याबाबतच्या आकड्यांची चर्चा आज तरी झालेली नाही अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. परंतु जागावाटप करताना मित्र पक्षांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असे वक्तव्य या बैठकीत अमित शाह यांनी केलेले आहे.
भाजपाकडून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांना प्रत्येकी 64 जागा देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत हा प्रस्ताव अमान्य असल्याचे सांगितले होते. दरम्यान, अमित शाह यांनी मित्र पक्षांना सन्मानजनक जागा देणार असे जाहीर केले असून या निर्णयाचे खासदार सुनील तटकरे यांनी स्वागत केलेले आहे.