Nagpur Hit and Run Case : पुण्यातील पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती नागपूरमध्ये झाल्याचे पाहायला मिळते आहे. सध्याच्या घडीला नागपूरमधील हिट अँड रन प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. नागपुरात एका भरधाव वेगाने आलेल्या एका ऑडी कारने शहरातील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे ज्या ऑडी कारने हा अपघात झाला, ती कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याची माहिती आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, नागपूर पोलिसांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.
नागपुरातील हिट अँड रन घटनेनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत याविषयी सविस्तर माहिती दिली. या पत्रकार परिषदेत पोलिसांनी आतापर्यंत या घटनेचा तपास कसा सुरु आहे, याची माहिती दिली. “सोमवारी रात्री अपघात झाला. यानंतर अर्जुन हावरे, रोनित चित्तमवार, आणि संकेत बावनकुळे यांना चौकशीसाठी बोलण्यात आले होते. या तिघांचीही चौकशी करण्यात आली. याप्रकरणी ड्रायव्हरला अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा जामीनावर त्याची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले, “संकेत हा ड्रायव्हरच्या शेजारी असलेल्या सीटवर बसलेला होता. अर्जुन हावरे हा यावेळी कार चालवत होता. तर रोनित चित्तमवार हा मागच्या सीटवर बसला होता. हे तिघेही एका हॉटेलमध्ये जेवल्यानंतर उशिरा रात्री घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी घरी जाताना वाटेत हा अपघात घडला. या घटनेनंतर संकेत बावनकुळे हा घटनास्थळी आढळून आला नाही. तर या घटनेवेळी अर्जुन हावरे सापडला. यावेळी तो नशेत होता. डॉक्टरने याबद्दल पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आहे. त्याचे ब्लड सॅम्पलही पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर अर्जुन आणि रोनित या दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे समोर आले आहे. त्या दोघांचेही ब्लड सॅम्पल तपासासाठी पाठवले आहे.
याप्रकरणी फक्त अर्जुनवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजून तापस सुरु असून, लवकर याप्रकरणी दोषींनावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणावर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “या प्रकरणात पोलिसांनी कुठलाही वेगळा न्याय लावू नये. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. “माझ्या मुलाच्या नावे ती गाडी आहे. या अपघाताची पोलिसांनी निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करावी, कुणालाही वेगळा न्याय लावू नये. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. न्याय सर्वांना सारखा असायला हवा मग कुणी राजकारणाशी सबंधित असो किंवा आणखी कुणी असो.” असे बावनकुळे म्हणाले आहेत.