महाराष्ट्रातील आमदार अपात्रता प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी आज होणार नसल्याचे थोड्या वेळापूर्वी स्पष्ट झाले आहे. आजची सुनावणी आठवडाभराने पुढे ढकलली असून पुढील बुधवारी ह्या सुनावणीसाठी कोर्टाकडून वेळ देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पहिल्या क्रमांकाच्या केसवरच दिवसभर सुनावणी होणार असल्याने शिवसेना – राष्ट्रवादी केस बाबत सुनावणी होणार नाही असे कारण कोर्टाकडून देण्यात आले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी होणार होती.
एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे चिन्ह आणि धनुष्य-बाण देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे. ह्या महाराष्ट्रातील सत्ताबदलास कलाटणी देणाऱ्या ह्या दोन प्रकरणांबाबत गेले अनेक महिने सुनावणी चालूच आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना अपात्र ठरवले नव्हते, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या वतीने सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली होती. तर दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांना अपात्र ठरवले नव्हते त्यामुळे शरद पवार यांच्या वतीने जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली होती. हे प्रकरण काही महिन्यांपासून प्रलंबित असून त्यावर सविस्तर सुनावणी झालेली नाही. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांच्या बाजूचे म्हणणे आहे.
दरम्यान, भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होणार आहेत. ते निवृत्त होण्यापूर्वी ह्या सुनावणी पूर्ण होणे महत्त्वाचे ठरणार आहे.तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाला या प्रकरणावर लवकरात लवकर अंतिम निकाल देणे गरजेचे असणार आहे.