Nagpur Hit and Run Case : नागपूरमधील हिट अँड रन प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. नागपुरात एका भरधाव ऑडी कारने शहरातील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेत जीवित हानी झाली नसली तरी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच स्थानिक गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे ज्या ऑडी कारने हा अपघात झाला, ती कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत, अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांनी या हिट अँड रन प्रकरणावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व तथ्ये मांडली आहेत ज्या प्रकारे संपूर्ण प्रकरणाचे राजकारण केले जात आहे, मला ते चुकीचे वाटते. अशा प्रक्रारे चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट करणे चुकीचे आहे…” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
या प्रकरणाचा नागपूर पोलीस तपास करत असून, एक जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “सोमवारी रात्री हा अपघात झाला. यानंतर अर्जुन हावरे, रोनित चित्तमवार, आणि संकेत बावनकुळे यांना चौकशीसाठी बोलण्यात आले होते. या तिघांचीही चौकशी करण्यात आली. याप्रकरणी ड्रायव्हरला अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा जामीनावर त्याची सुटका करण्यात आली.
संकेत हा ड्रायव्हरच्या शेजारी असलेल्या सीटवर बसलेला होता. अर्जुन हावरे हा यावेळी कार चालवत होता. तर रोनित चित्तमवार हा मागच्या सीटवर बसला होता. हे तिघेही एका हॉटेलमध्ये जेवल्यानंतर उशिरा रात्री घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी घरी जाताना वाटेत हा अपघात घडला. या घटनेनंतर संकेत बावनकुळे हा घटनास्थळी आढळून आला नाही. तर या घटनेवेळी अर्जुन हावरे सापडला. यावेळी तो नशेत होता. याप्रकरणी फक्त अर्जुनवरच गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी अजून तापस सुरु असून, लवकर याप्रकरणी दोषींनावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.