हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (Haryana Vidhansabha Election )प्रचार युद्ध सुरू झाले असून, सत्ताधारी भारतीय जनता पार्टी ( Bharatiya Janata Party ) विजयी हॅटट्रिक साधण्यासाठी संपूर्ण तयारी करताना दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या प्रचारात महत्वाची भूमिका असणार असल्याचे दिसून येत आहे.
सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 सप्टेंबर रोजी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात कुरुक्षेत्र येथील रॅलीने करणार आहेत. या ठिकाणी लाडवा मतदारसंघातून मुख्यमंत्री नायब सिंह सैनी भाजपाचे उमेदवार आहेत. पीएम मोदी हरियाणा विधानसभा निवडणुकीत एकूण 5 रॅलींना संबोधित करून भाजपाच्या बाजूने मत देण्यासाठी लोकांच्या मनात जागा निर्माण करतील, तसेच त्या प्रकारचे वातावरण निर्माण करतील असे सांगितले जात आहे.
भाजपाच्या निवडणूक रणनीतीनुसार, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर जोर देण्यात येईल, तसेच यावेळी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे उचलून धरले जातील.याचसोबत जेलमध्ये बंद असलेल्या आमदारांना तिकीट दिले जाणे हा देखील एक मोठा मुद्दा असू शकते. भाजपाच्या रणनीतीत गैर-जाट जातींवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सध्या 13 जाट उमेदवार निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत आणि अजून 23 सीट्सवर उमेदवार घोषित करणे बाकी आहे.
भाजपाच्या प्रचारात शेतकऱ्यांच्या आणि महिला मतदारांच्या मुद्द्यांवरही लक्ष देण्यात येईल. पिकांची एमएसपी दराने खरेदी, सरकारी नोकऱ्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार या मुद्द्यांवर भर देण्यात येईल. दरम्यान, हरियाणामध्ये 90 विधानसभा जागांसाठी मतदान 5 ऑक्टोबर रोजी एकच टप्प्यात होईल आणि 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीत भाजपाची रणनीती आणि पंतप्रधान मोदींकडून होत असलेला प्रचार आगामी मतदानावर मोठा प्रभाव टाकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.