मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी (Sitaram Yechury )यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. १९ ऑगस्ट रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू असून आज २३ दिवस होऊन गेले तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही उलट खालावत असल्याचे दिसून आले आहे.आता सीताराम येचुरी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.
नुकतेच सीताराम येचुरी यांचे मोतिबिंदूचे ऑपरेशनही झाले होते. आता त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असून सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. याबाबत सीपीएमने निवेदन जारी केलेले आहे. या निवेदनात कॉम्रेड सीताराम येचुरी यांना श्वसनाच्या गंभीर संसर्गाने ग्रासले आहे अशी माहिती देण्यात आली आहे तसेच डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत असून त्यांच्या प्रकृतीवर देखील डॉक्टरांचे पथक सतत लक्ष ठेऊन आहे असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सीताराम येचुरी हे भारताच्या डाव्या विचारप्रवाहातील महत्वाचे व्यक्ती आहेत. वंचित, कामगार व मागास वर्गाच्या हक्कांसाठीच्या अनेक आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी पार पाडले आहे. २०१५ साली सीताराम येचुरी यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव म्हणून नियुक्त झाली होती . १२ वर्षं त्यांनी राज्यसभेत खासदार म्हणून काम केलेले आहे. कामगार, मागासवर्ग, मध्यमवर्ग यांच्या विषयी त्यांनी त्या काळात ठाम भूमिका मांडल्या होत्या.
१९७४ साली स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एसएफआयमध्ये सीताराम येचुरी यांनी प्रवेश घेतAला होता. एका वर्षातच ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झालेले. १९७७-७८ मध्ये ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून देखील आले होते. तर १९७५ साली जेएनयूमध्ये असतानाच त्यांना आणीबाणीच्या काळात अटक करण्यात आली होती.
याचसोबत त्यांनी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन मार्फत उच्च माध्यमिक परीक्षेत ऑल इंडिया रँक वन मिळविले आहे तसेच सीताराम येचुरी यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून प्रथम क्रमांकाने अर्थशास्त्रात बीए पूर्ण केलेले आहे.