Kirit Somaiya : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve ) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे किरीट सोमय्या यांना पुन्हा पक्षाचे काम देण्यात आले. निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, किरीट सोमय्या यांनी हे सदस्य पद स्वीकारण्यास नकार दिला आहे.
याबाबत किरीट सोमय्या यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना एक पत्र लिहिलं आहे.
मला न विचारता नावाची घोषणा केली ही पद्धत चुकीची असून मला ही मान्य नाही. मला पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये, अशी उघड नाराजी किरीट सोमय्या यांनी यावेळी व्यक्त केली. नेमकं पत्रात काय म्हणाले आहेत जाणून घेऊया…
चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रात काय लिहिलंय?
किरीट सोमय्या पत्रात म्हणतात, प्रिय बावनकुळेजी, मला प्रचार समितीचा सदस्य म्हणून नियुक्त केल्याबद्दल आभार मानतो आणि या समितीत काम करण्यास असमर्थता व्यक्त करतो. गेली साडेपाच (5 1/2) वर्ष, म्हणजे 18 फेब्रुवारी 2019 पासून, मी भाजपचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे. मला सामान्य सदस्य म्हणून काम करू द्यावे” असं ते म्हणाले आहेत.
रावसाहेब दानवे यांना लिहिलेल्या पत्रात काय लिहिलंय?
“आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाचीतरी नियुक्ती करावी. 18 फेब्रुवारी 2019 रोजी भाजपा-शिवसेना यांची ब्ल्यू सी हॉटेल वरळी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजप नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले. तेव्हापासून आजपर्यंत मी भाजपाचा एक सामान्य सदस्स/कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे.
मधल्या काळात ठाकरे घोटाळे बाहेर काढण्याची जवाबदारी मी स्वीकारली होती. माझ्यावर तीन वेळा जीवघेणे हल्लेही झाले. तरीही मी जवाबदारी पार पाडली. गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात, ते पुरेसे आहे. या विभानसभा निवडणुकीसाठीही मी स्वतः ला पूर्णपणे झोकून दिले आहे. मी काम करत आहे करत राहणार. पण आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण व प्रदेश अध्यक्षाने पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये”, अशी विंनती करतो. असं त्यांनी पत्रात म्हंटल आहे.