Marathwada Rain Affected Area : गेल्या आठवडाभरापासून मराठवा़ड्यात (Marathwada Rain) मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थित (Flood) निर्माण झाली असून, अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर १ जून ते ६ सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत ५३ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे.
हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड, परभणी या भागात मुसळधार पाऊस झाला असून अनेक जिल्ह्यांना पूरस्थितीचा सामना करावा लागला.
या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील २२ लाख ४८ हजार ४४५ शेतकऱ्यांचे १८ लाख ५ हजार ८६२ हेक्टरवरील खरीप पिकांचे तसेच फळबागांचे नुकसान झाले. यात १७ लाख ५६ हजार ८८९ हेक्टरवरील जिरायत, २७ हजार ८६३ क्षेत्रावरील बागा, तर २१ हजार ११० हेक्टरवरील फळबागांना पावसाचा तडाखा बसला आहे.
दरम्यान, मराठवाड्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यानुसार १८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळबागांना फटका बसला आहे. तर या विभागात ३९.६५ टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. यानुसार ७ लाख २० हजार हेक्टरवरील पंचनामे झाले असून, ११ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे अद्याप शिल्लक आहेत.
नांदेड जिल्ह्यातील ४ लाख ५१ हजार ९९३ हेक्टर, परभणी जिल्ह्यातील ३ लाख ५१ हजार ५७८ हेक्टर, हिंगोलीतील २ लाख ८१ हजार ६७९ हेक्टर, लातूरमधील २ लाख ६ हजार ६१४, तर जालना २ लाख १२ हजार ५६९, छत्रपती संभाजीनगर १ लाख ७६ हजार ९३६, बीडमध्ये १ लाख १८ हजार ४२५, तर धाराशिव जिल्ह्यात ६ हजार ६७ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीमध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ५३ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. शिवाय १६ जण जखमी झाले आहेत. तर यामध्ये सुमारे १२६९ जनावरांना आपला जीव गमवावा लागला. तसेच घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.