आज पाकिस्तानमधील करोर येथे ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे धक्के अफगाणिस्तान,भारतातील पंजाब ,नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, आणि जम्मू काश्मीरच्या काही भागातही जाणवलेले आहेत. यासंदर्भातील एक वृत्त पीटीआयने दिले आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानमधील इस्लामाबादपासून 359 किमी, अफगाणिस्तानमधील काबुलपासून 387 किमी, पंजाबमधील अमृतसरपासून 415 किमी, जम्मू-काश्मीरमधील राजौरीपासून 427 किमी आणि पंजाबमधील भटिंडा येथून 438 किमी अंतरावर असल्याची माहिती एनसीएसने दिलेली आहे.
आज दुपारी पाकिस्तानमध्ये १२.५८ वाजता हा भूकंप झाला असून ५.८ रिश्टर स्केलचा हा भूकंप असल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपाची खोली १० किलोमीटर होती अशी माहिती जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेस (GFZ) ने दिलेली आहे.
दरम्यान, जमिनीच्या आत होणाऱ्या हालचालींमुळे जे कंपन तयार होते ती स्थिती म्हणजे भूकंप असे म्हणतात. तसेच उल्का आघात आणि ज्वालामुखीचा उद्रेक खाण चाचणी आणि आण्विक चाचणी यामुळे देखील अनेकदा भूकंप होत असतात. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर मोजली जात असून रिश्टर स्केलवर 2.0 किंवा 3.0 तीव्रतेचा भूकंप सौम्य असतो, तर 6 तीव्रतेचा भूकंप म्हणजे शक्तिशाली भूकंप असे म्हणतात.