लोकसभा निवडणुकीत महायुतीसह भाजपला राज्यात मोठा फटका बसला होता. विदर्भात तर दोनच जागा भाजपला राखता आल्या होत्या . आगामी विधानसभा निवडणुकीआधी भाजपने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भात मोठा फटका भाजपला बसल्याने आता विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Elections) त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजपने विदर्भातील जिल्ह्याकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chanadrashekhar Banvankule) हे 12 सप्टेंबर पासून तीन दिवस अकोला, वाशिम आणि बुलढाणा या पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तीन दिवसांच्या या दौऱ्यात चंद्रशेखर बावनकुळे विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन ते मतदार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर असा बावनकुळे यांचा दौरा असणार आहे
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते आणि भाजपा पदाधिकारी त्यांच्या या दौऱ्यात उपस्थित राहणार आहेत.
असा असेल अकोला दौरा!
मिळालेल्या माहितीनुसार, बावनकुळे हे 12 सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यात येतील. ते दौऱ्याची सुरुवात मूर्तीजापूर येथून करणार आहेत. मूर्तिजापूर येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात मूर्तीजापूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. तर दुपारी अकोट येथील सत्यम पॅलेस हॉटेल येथे अकोट विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. आणि सायंकाळी अकोला येथील जलसा हॉटेल, येथे अकोला पूर्व व अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर सायं. 7 वाजता पारस येथील न्यू क्लब बिल्डिंग औष्णिक वीज केंद्र, पारस येथे बाळापूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
वाशिम जिल्ह्यातही आढावा!
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 सप्टेंबरला वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे रिसोड विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी वाशीम शहरातील परशुराम भवन, जुनी नगर पालिका रोड, आंबेडकर मार्ग येथे वाशीम विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. तर सायंकाळी मानोरा येथील ठाकरे पॅलेस, लालमाती, मंगरूळपीर रोड येथे कारंजालाड विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
असा असेल बुलढाणा दौरा!
सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे हॉटेल मीरा सेलिब्रेशन येथे चिखली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर दुपारी मलकापूर येथील भाजपा कार्यालय गणपती नगर येथे मलकापूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी खामगाव येथील तुळजाई हॉटेल, पंचायत समिती समोर येथे खामगाव विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे.