Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Legislative Assembly election 2024 ) तोंडावर बारामती (Baramati) मतदारसंघात अजित पवारांच्या (Ajit Pawar ) नावाने लिहिलेले एक पत्र सध्या व्हायरल होत आहे. या पत्राची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. हे पत्र एका कार्यकर्त्याने लिहिले आहे. या पत्रात कार्यकर्त्याने नाराजी व्यक्त केली आहे.
या पत्रात दादांवर कुणाच्या तरी दबावाखाली भावनिक कार्ड खेळण्याचा आरोप करण्यात आला आहे. आम्ही तुमच्यासाठी पवार साहेबांना धोका दिला, पण आम्हाला काय मिळाले? असा सवालही या पत्रात विचारण्यात आला आहे.
तसेच या पत्रात अजित पवारांचा स्वभाव देखील बदलला असल्याचा दावा केला आहे. दादा, आजकाल तुमचं वागणं, बोलणं आणि ऐकणंसुद्धा बदललं आहे. तुम्ही खदखद व्यक्त करताय, मन मोकळं करताय की भावनिक कार्ड खेळताय हेच समजत नाही. तुमच्या भाषणातला रांगडेपणा, स्पष्टपणा, रोखठोक आणि लढावू बाणा हरवला आहे की काय? असा सवाल देखील
करण्यात आला आहे
खरं तर लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचा दारुण पराभव झाला. सर्वाधिक वाताहत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झाली. चार जागा लढवणाऱ्या अजित पवार गटाला फक्त एक जागा जिंकता आली. त्यात बारामतीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंनी धुव्वा उडवला. विशेष म्हणजे याच मतदारसंघातून अजित पवार २०१९ मध्ये तब्बल दीड लाखांहून अधिक मताधिक्क्यानं विजयी झाले होते.
अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून महायुतीत प्रवेश केला. ज्याचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत बसला. या पराभवानंतर पवारांच्या वागण्या बोलण्यात बराच बदल पाहायला मिळाला. त्यांचा पेहराव देखील बदलला. यावरूच कार्यकर्त्याने पत्र लिहीत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
आमचे कणखर दादा आता आम्हाला कुठेच दिसत नाहीत. कधी नव्हे ते तुम्ही इतके हतबल का दिसत आहात, असा सवाल कार्यकर्त्याने या पत्रातून अजित पवारांना केला आहे.
तसेच कार्यकर्त्याने पुढे लिहिले, आमचं दुर्दैव आहे की नाव लपवून पत्र लिहावे लागत आहे. कारण, नाव कळलं तर आम्हाला पुढे राजकारणात भविष्य राहील का? अशी भीती देखील यावेळी कार्यकर्त्याने व्यक्त केली आहे.