Mumbai News : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या (Shiv Sena) आमदाराच्या सुरक्षारक्षकाने भररस्त्यात एका कार चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हा प्रकार काल दुपारच्या सुरमारास घडला. ही मारहाण कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंच्या सुरक्षारक्षकानं केली असल्याची माहिती आहे.
या घटनेवरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच नागरिकनांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या या घटनेमुळे पुन्हा कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. तसेच सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
या मारहाण प्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ही मारहाण करणारा व्यक्ती शिवाजी सोनावणे याला नेरळ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी शिवाजी सोनावणे हा शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला.
महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या 'शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही…
कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल!ही फक्त… pic.twitter.com/n0QX7Pp92x
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 11, 2024
मात्र, या सगळ्यावर आता आमदार थोरवे यांनी प्रतिक्रिया दिली असून, ठाकरे गटाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मारहाण करणारी व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. मात्र, माझ्या परिचयाची आहे. ज्याला मारहाण झाली आणि जो मारहाण करतोय ते दोघे शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचे थोरवे यांनी सांगितले.
नेमका काय आहे प्रकार?
काल दुपारी कर्जतमधील नेरळमध्ये मारहाणीची घटना घडली, भररस्त्यात एका कार चालकाला लोखंडी रॉडने बेदम मारण्यात आले. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, याच व्हायरल व्हिडिओवरून आरोपी शिवाजी सोनावणे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप अधिकृत वक्तव्य आले असून, या प्रकरणाचा तपास सुरु आहे.