MLA Disqualification Case Update : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत (MLA Disqualification Case) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या तारखांचे सत्र सुरूच आहे. शिवसेना पक्षाचे (Shiv Sena) नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. याप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात 21 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. याआधी 17 सप्टेंबरला सुनावणी पार पडणार होती मात्र, पुन्हा एकदा ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता असून, सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात फूट पडल्यानंतर दोन्ही गटानी एकमेकांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकेवर तातडीने निर्णय घेण्यात यावा यासाठी उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने विनंती केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुनावणी प्रलंबित आहे.
यापूर्वी सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली होती त्यामुळे आज सुनावणी होणार हे उघड होते. मात्र आगामी सुनावणी ही लांबणीवर गेली असून, आता 21 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
दरम्यान, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. या भेटीवर आता ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे. सरन्यायाधीश यात वेगळी भूमिका घेतील का? आम्हाला न्याय देऊ शकतील का? असा प्रश्न ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात येत आहे.