Kirit Somaiya : दोन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या नावाची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) आयोग संपर्क प्रमुख म्हणून घोषणा करण्यात आली होती. मात्र किरीट सोमय्या यांनी हे सदस्य पद स्वीकारण्यास नकार दिला. अशा स्थितीत त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या.
यावरच आता किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, “गेली साडेपाच वर्ष कोणतंही पद माझ्याकडे नाही. भारतीय जनता पक्षातील सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे. १८ फेब्रुवारी २०१९ मध्ये उद्धव ठाकरे हे अमित शाह यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत यायला तयार नव्हते. तेव्हा पत्रकार परिषदेमधून देवेंद्र फडणवीस यांनी मला निघून जायला सांगितलं. तेव्हापासून आजपर्यंत मी जीव लावून काम केले आहे. मला कुठल्याही पदाची गरज नाही. आता हे त्यांनाही पटलं आहे. आम्ही काम जोराने करत आहोत. नाराजी वगैरे नाही. तसेच पुढे त्यांनी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल.” असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.
खरं तर किरीट सोमय्या यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना एक पत्र लिहून सदस्य पद स्वीकारण्यास नकार दिला होता. आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला अमान्य आहे. अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक पुन्हा देऊ नका असे म्हंटले होते. त्यानंतर ते पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांनी आता यावर स्पष्टीकरण दिले असून, इथून पुढे मी पक्षात सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत राहील असे सांगितले आहे.