Pune Ganapati 2024 : गणपती बाप्पाच्या आगमनाने (Pune Ganapati 2024 ) महाराष्ट्रभर जल्लोष सुरु आहे. बाप्पा आणि ढोल-ताशा पथक (Dhol Tasha Pathak) यांचे एक वेगळेच नाते आहे. अशातच आता ढोल-ताशा पथकांसंबंधी एक मोठी बातमी समोर येत आहे.
खरं तर हरित लवादाच्या एका निर्णयामुळे ढोल-ताशा पथकांच्या उत्साहाला मर्यादा येणार होत्या. मात्र, आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एक मोठा निर्णय घेत ढोल-ताशा पथकांना मोठा दिलासा दिला आहे.
ढोल-ताशा पथकांमध्ये 30 पेक्षा जास्त वादक नसावेत, असा आदेश हरित लवादाने (NGT) दिला होता. याच आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.
आज सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने स्थगितीचे आदेश दिले आहेत. वादकांच्या संख्येबाबत असा निर्णय होऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हंटले आहे.
पुण्यातील गणेशमूर्ती विसर्जनावेळी ढोल-ताशा-झांज मंडळाच्या सदस्यांची संख्या ३० जणांपर्यंत मर्यादित असावी, असा आदेश हरित लवादने दिला होता. मात्र आता कोर्टाने राज्य सरकार, पुणे प्राधिकरण आणि इतरांना नोटीस बजावली आहे. त्यांना त्यांचे ढोल, ताशा वाजवू द्या…कारण ढोल-ताशा हे पुण्याच्या हृदयात आहे, अशा शब्दात कोर्टाने ढोल-ताशांचे समर्थन केले आहे.
गणेश उत्सव सुरू असताना सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यामध्ये अनेक मंडळांकडून पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीमध्ये ढोल-ताशांच्या पथकांचा समावेश असतो, हेच मुख्य आकर्षण असते. त्यामुळे हा निर्णय दिलासा देणारा ठरला आहे.