गेली पाच ते सहा वर्ष एसटी महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. मात्र आता एसटी महामंडळाची आर्थिक घोडदौड सुरू झाली असल्याचे दिसत आहे ऑगस्ट महिन्यात एसटी महामंडळाच्या ३१ विभागांपैकी २० विभागांनी नफा कमवलेला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाला १६ कोटी ८६ लाख, ६१ हजार रुपये इतका नफा झालेला आहे. यामुळेच आता एसटी महामंडळात आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना काळात एसटी महामंडळ पूर्णपणे तोट्यात गेले होते. या काळात एसटी बसगाड्यांचा ताफा १८ हजारावरुन १६ हजारावर आला होता. २०१५ हे एसटी महामंडळाचे शेवटचे नफ्याचे वर्ष होते यानंतर एसटी महामंडळ तोट्यात गेले होते. तब्बल ९ वर्षांनी एसटी महामंडळाला नफा मिळाल्याने एसटी महामंडळातील सर्व कर्मचारी आनंदी झाले आहेत.
एसटी महामंडळाच्या ३१ विभागांपैकी २० विभागांनी ऑगस्ट महिन्यात नफा कमवलेला आहे. उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.तसेच भविष्यात देखील प्रयत्नांची पराकाष्टा करून महामंडळ सातत्याने फायद्यात येईल असे प्रयत्न करावे असे आवाहन डॉ. माधव कुसेकर यांनी केले आहे.
दरम्यान, कोरोना महामारीच्या आधी तब्बल 22 कोटी रुपयांचे दररोज उत्पन्न एसटी महामंडळाला मिळत होते. परंतु कोरोना काळात आणि कोरोना नंतरच्या काळात एसटी महामंडळाच्या नफ्यात प्रचंड घट झाली होती.