मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे (माकप) नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. येचुरी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. मागील महिन्यात त्यांना अशक्तपणा जाणवू लागल्याने 19 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येचुरी यांना एक्यूट रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इंफेक्शन झाले होते. अखेर आज त्यांना या आजाराशी लढण्यात अपयश आले आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
12 ऑगस्ट 1952 रोजी सीताराम येचुरी यांचा जन्म झाला होता. सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे त्यांचे वडील. त्यांचे वडील सर्वेश्वर येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य रस्ते परिवहन विभागात इंजिनियर पदावर होते. तसेच कल्पकम येचुरी या त्यांच्या आई होत्या. कल्पकम येचुरी या सरकारी अधिकारी पदी होत्या.
नवी दिल्लीच्या प्रेसिडेंट्स एस्टेट स्कुलमध्ये सीताराम येचुरी यांचे शिक्षण झाले होते. तसेच दिल्लीमधील सेंट स्टीफन कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयाच बीए चे शिक्षण सीताराम येचुरी यांनी घेतले होते. याचसोबत दिल्लीतील जेएनयू येथे एम.ए. अर्थशास्त्रचं शिक्षण देखील त्यांनी घेतले होते. जेएनयूमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांनी राजकारणाकडे वाटचाल केली होती. 1996 मध्ये सीताराम येचुरी यांनी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यासोबत संयुक्त आघाडी सरकारसाठी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला होता.
तसेच १९८४ साली सीताराम येचुरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीचे सदस्य झाले होते. २०१५ साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी १२ वर्षं राज्यसभेत खासदार म्हणूनही काम केले आहे.
त्यांच्या मृत्युच्या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी एक्स अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली आहे. सीताराम येचुरी हे अनुभवी खासदार होते. त्यांच्या निधनाने देशाच्या राजकारणाची हानी होत आहे. त्यांच्या निधनाचे अतिशय दुख: होत आहे.” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.