आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अजित पवार गटाकडून २५ उमेदवारांची नावे समोर आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीत या २५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारच निवडणूक लढवणार असल्याची महत्वाची माहिती देखील मिळाली आहे. याचसोबत या यादीतील २५ उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत.
महायुतीची चर्चा सुरु असून लवकरच जागावाटप पूर्ण होणार आहे परंतु त्याआधीच उमेदवारांची निवडणुकीसाठी तयारी असावी या दृष्टीने आतापासून कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य २५ उमेदवार कोण असतील असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यामध्ये बारामती मधून अजित पवार निवडणूक लढवतील. उदगीर मतदारसंघातून संजय बनसोडे, आंबेगाव मतदारसंघातून दिलीप वळसे-पाटील, दिंडोरी मतदारसंघातून नरहरा झिरवळ, येवला मतदारसंघातून छगन भुजबळ,पुसद मतदारसंघातून इंद्रनील नाईक, वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघातून मकरंद आबा पाटील आणि पिंपरी मतदारसंघातून अण्णा बनसोडे हे संभाव्य उमेदवार आहेत.
याचसोबत परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे, इंदापूर मतदारसंघातून दत्ता भरणे, रायगड मतदारसंघातून अदिती तटकरे, कळवण मतदारसंघातून नितिन पवार, मावळ मतदारसंघातून सुनील शेळके, अमळनेर मतदारसंघातून अनिल पाटील, अहेरी मतदारसंघातून धर्मराव बाबा अत्राम, कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ, खेड मतदारसंघातून दिलीप मोहिते-पाटील, अहमदनगर मतदारसंघातून संग्राम जगताप, जुन्नर मतदारसंघातून अतुल बेनके, वडगाव शेरी मतदारसंघातून सुनील टिंगरे ह्यांचाही संभाव्य २५ उमेवारांच्या यादीमध्ये समावेश असणार आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार की नाही ?अशा चर्चा रंगत होत्या परंतु आता या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.