जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) आज जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. तब्बल 45 वर्षांनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी डोडा जिल्ह्यात प्रचारासाठी पोचणार आहेत. ही निवडणूक रॅली दोडा स्पोर्ट्स स्टेडियमवर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीही पहिल्यांदाच जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या सभेसाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
डोडा जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून दहशतवादी हल्ले होत आहेत असे असताना देखील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी जनतेला संबोधित करणार आहेत. याचसोबत हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी कुरुक्षेत्र येथे निवडणूक रॅलीला संबोधित करणार आहेत. हरियाणाच्या आगामी निवडणुकीसाठी ही रॅली अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे केवळ कुरुक्षेत्रातच नाही तर कर्नाल, अंबाला, कैथल आणि यमुनानगर या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये भाजप पक्षाच्या उमेदवारांची निवडून येण्याची शक्यता बळकट होईल असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
खोऱ्यातील काही मतदारसंघातील परिस्थिती लक्षात घेऊन भाजप अपक्ष आमदारांना पाठिंबा देऊ शकते.जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स (NC) यांनी युती केली आहे. नॅशनल कॉन्फरन्स 52 तर काँग्रेस 31 जागांवर निवडणूक लढवत आहे. याशिवाय त्यांनी सीपीआय (एम) आणि पँथर्स पार्टीसाठी प्रत्येकी एक जागा सोडली आहे अशी माहिती पक्षाचे जम्मू आणि काश्मीर अध्यक्ष रविंदर रैना यांनी दिली आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुका होणार असून हरियाणात ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे.