मोदी सरकारकडून ब्रिटिशांच्या गुलामगिरीची भारतातील सर्व चिन्हे हटवण्यात येत आहेत. आतापर्यंत अनेक शहरांची नावे बदलण्यात आलेली आहेत. आता मोदी सरकारकडून पुनः एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांची (Andaman and Nicobar Islands) राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजयपुरम करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे या निर्णयाची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी शुक्रवारी घोषणा केली आहे.
याबाबतची माहिती देणारी अमित शाह यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याचा संकल्प आहे. त्यांच्या या संकल्पापासून प्रेरित होऊन गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव ‘श्री विजयपुरम’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यामधील अंदमान निकोबारचे योगदान ‘श्री विजयपुरम’ या नावातून दिसून येईल. तसेच या बेटाला आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आणि इतिहासात अनन्यसाधारण स्थान आहे असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या ठिकाणीच भारताचा तिरंगा फडकवला होता. तसेच याच ठिकाणी सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता. हे बेट त्या स्वातंत्र्यलढ्याची साक्ष देत आहे आणि आता हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज झाले आहे. चोल सम्राटांनी या बेटांवरच त्यांच्या नौदलाचे तळ उभारले होते असे देखील अमित शाह म्हणाले आहेत.
दरम्यान, १७८९ साली ईस्ट इंडिया कंपनीकडून आर्चीबाल्ड ब्लेअर (Archibald Blair) यांच्या सन्मानार्थ या बेटाचे नाव पोर्ट ब्लेअर असे ठेवण्यात आले होते आता हे नाव बदलून श्री विजयपुरम करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.