Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. शुक्रवारी केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवाल आज आप कार्यालयात पोहोचले. येथे त्यांनी आप कार्यकर्त्यांना संबोधित केले. यादरम्यान केजरीवाल यांनी मोठी घोषणा करत दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हंटले आहे.
केजरीवाल म्हणाले की, “देवाचा आपल्या सर्वांवर मोठा आशीर्वाद आहे. म्हणूनच आपण मोठ्या समस्यांशी लढतो आणि विजयी होऊन बाहेर पडतो. यासह मी लाखो लोकांचे आभार मानतो ज्यांनी आमच्या साथीदारांसाठी प्रार्थना केली. भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, आमच्या लोकांना तुरुंगात पाठवून आम आदमी पार्टी फोडायची होती. तुरुंगात राहिल्याने माझे मनोबल वाढले आहे. तुरुंगातून एलजीला पत्र लिहिले तेव्हा मला धमकी देण्यात आली. यावेळी त्यांनी कौटुंबिक भेटीगाठी बंद करण्याच्या धमक्या दिल्या.
आज मैं जनता से पूछने आया हूँ कि आप केजरीवाल को ईमानदार मानते हो या गुनाहगार
अब जब तक दिल्ली की जनता अपना फ़ैसला नहीं सुना देती है तब तक मैं CM की कुर्सी पर नहीं बैठूँगा।
मैं आज से 2 दिन बाद मुख्यमंत्री के पद से इस्तीफ़ा दे दूंगा। @ArvindKejriwal #केजरीवाल_ईमानदार_है pic.twitter.com/i59f5U9gVV
— AAP (@AamAadmiParty) September 15, 2024
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांमुळे आम्ही काम करू शकणार नाही, असे काही जणांना वाटत आहे. विरोधकांनी आमच्यावर निर्बंध लादण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मी आता जनतेच्या कोर्टात जाणार आहे. येत्या दोन दिवसांनी मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही… मी प्रत्येक घरात आणि रस्त्यावर जाऊन जनतेची भेट घेणार असून जनतेचा निकाल येईपर्यंत मुख्यमंत्र्यांची खुर्चीत बसणार नाही, असे म्हंटले आहे.
भाजपवर टीका करताना ते म्हणाले, भाजपला पक्ष तोडून सरकार स्थापन करायचे आहे. आमचे मनोबल त्यांना नष्ट करायचे होते, पण ते अपयशी ठरले. त्यांना माझे धाडस व मनोबल तोडायचे होते. पक्ष तोडणे, आमदार तोडणे, नेत्यांना तुरुंगात पाठविणे हा फॉर्म्युला भाजपने तयार केला आहे. केजरीवाल यांना तुरुंगात पाठवून दिल्लीत सरकार स्थापन करू, असे त्यांना वाटत होते. पण ते आमचा पक्ष तोडू शकले नाहीत.