Meerut : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये शनिवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. येथे एक 50 वर्षे जुनी इमारत अचानक कोसळली. या घटनेत येथे राहणाऱ्या कुटुंबातील 15 जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सापडले अखेर 16 तासांच्या बचावकार्यानंतर 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ज्यामध्ये 8 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. तर यामध्ये पाच निष्पाप मुलांचाही समावेश आहे.
अपघाताचा आवाज ऐकून परिसरात गर्दी जमली आणि उपस्थित नागरिकांनी मदत सुरु केली, घटनेची माहिती मिळताच परिसरातील पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली आणि वेगाने बचाव कार्य सुरु केले. या घटनेतील जखमी लोकांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अजूनही येथे बचाव कार्य सुरु आहे.
काल संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मेरठमधील झाकीर कॉलनीत तीन मजली इमारत कोसळून आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मेरठचे जिल्हाधिकारी दीपक मीणा यांनी सांगितले की, “झाकीर कॉलनीत तीन मजली घर कोसळल्याने 10 लोकांचा मृत्यू झाला आहे तर आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेत जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासोबतच घनेटनेच्या ठिकाणी अजूनही बचाव कार्य सुरु आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत 50-60 वर्षे जुनी होती. त्याचा पाया देखील कमकुवत होता, परंतु कुटुंबाने गरजेनुसार वरचे मजले तयार केले. हे कुटुंब डेअरी फार्म चालवत होते. त्यासाठी सर्वात खालच्या मजल्यावर गुरे बांधण्यात आली. वरच्या मजल्यावर संपूर्ण कुटुंब राहत होते. दरम्यान, या अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे.