ST Bus : लालपरीचा प्रवास जितका आनंद देणारा आहे तितकाच तो नकोसा वाटणारा देखील आहे. आठवणींनी भरुन जाणारा हा प्रवास कधी-कधी त्रासदायक ठरतो. कधी बस चालकासोबत वाद तर कधी बाजूच्या प्रवाशांसोबत झालेल्या कटकटीतून हा प्रवास नकोसा वाटतो. अनेकदा तर बस प्रवासात बसची दूरवस्थाही आपल्या संतापाचे कारण ठरते. या सर्व अडचणींमध्ये बस प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा करणे यात काहीही गैर नाही.
अशातच आता एसटी प्रशासनाकडून अशा पद्धतीची एक यंत्रणा राबविण्यात येत आहे. एसटीच्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण आल्यास त्यांना थेट तक्रार आगार प्रमुखांना करता येणार आहे. जर तुम्हालाही तुमच्या प्रवासात अशाच काही समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तर तुम्ही थेट आगार प्रमुखांना थेट फोन करून तुमची तक्रार सांगू शकतात. जेणेकरून त्याचे तातडीने निराकरण होईल.
एसटी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगाराची आहे, त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक, तसेच तेथील स्थानक प्रमुख व कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तुम्ही त्या नंबरवर फोन करून तुमची तक्रार करू शकता.
एसटी प्रवासात चालक अतिवेगाने गाडी चालवत असेल. चालक गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असेल, वाहक उद्धट बोलत असेल किंवा योग्य ठिकाणी उतरवत नसेल तर तुम्ही त्यांची थेट तक्रार आगार प्रमुखांना करू शकता.
प्रवासादरम्यान प्रवाशांना अडचण अथवा समस्या निर्माण झाली तर त्या समस्येचे किंवा तक्रारी चे निराकरण तातडीने व्हावे, हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासादरम्यान त्यांना एखाद्या अडचण आल्यास थेट तिथे प्रदर्शित केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपल्या अडचणीत अथवा समस्येचे निवारण तातडीने करून घ्यावे.