Haryana Assembly Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने विजयाची पूर्ण तयारी केली असली तरी त्याआधी माजी गृहमंत्री अनिल विज यांच्या विधानामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अनिल विज यांनी म्हटले आहे की, आगामी निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तर ते मुख्यमंत्रिपदासाठी आपला दावा मांडणार आहेत. तर दुसरीकडे भाजपने आधीच स्पष्ट केलेलं आहे की, जर पक्ष सत्तेत आला तर नायबसिंह सैनी हे मुख्यमंत्री असतील.
अनिल विज हे हरियाणातील अंबाला कँट मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, जिथे ते काँग्रेसचे परिमल परि यांच्या विरुद्ध लढत आहेत. याशिवाय जेजेपीने अवतार कर्धन, आयएनएलडीने करतार सिंग आणि आपने राज कौर गिल यांना अंबाला कँटमधून तिकीट दिले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा हरियाणात नेतृत्व बदल झाला आणि मनोहर लाल यांच्या जागी नायबसिंग सैनी यांना मुख्यमंत्री करण्यात आले, तेव्हा अनिल विज राज्य मंत्रिमंडळातून बाहेर होते. त्यांना मनोहर लाल सरकारमध्ये गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. अशातच आता अनिल विज म्हणाले आहेत, “मी हरियाणाचा सर्वात ज्येष्ठ आमदार आहे. मी सहा वेळा निवडून आलो आहे. मी सातव्यांदा निवडणूक लढवणार आहे. आजपर्यंत मी पक्षाकडे कधीच काही मागितले नाही, पण यावेळी मला संपूर्ण हरियाणातील लोकांचा आणि अंबाला कॅन्टोन्मेंटच्या लोकांचा प्रचंड दबाव आहे. त्यामुळे यावेळी मी माझ्या ज्येष्ठतेच्या आधारे पक्षासमोर मुख्यमंत्रीपदावर दावा करणार आहे. त्यांनी मला मंत्री बनवायचे की नाही, हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे, पण मला बनवले तर मी हरियाणाचे नशीब आणि चेहरामोहरा बदलेल. असं ते यावेळी म्हणाले आहेत.
अनिल विज यांची राजकीय कारकिर्द
७१ वर्षीय अनिल विज यांच्या राजकीय कारकिर्दीकडे थोडे लक्ष दिले तर त्यांनी त्याची सुरुवात अभाविपपासून केली होती. 1990 मध्ये सुषमा स्वराज राज्यसभेवर निवडून आल्यावर अंबाला कॅन्टोन्मेंट विधानसभेची जागा रिक्त झाली. पोटनिवडणुकीत या जागेवर अनिल विज निवडून आले. 2005 च्या विधानसभा निवडणुकीत अनिल विज यांचा पराभव झाला होता. मात्र, 2009 मध्ये ते पुन्हा निवडून आले. तेव्हापासून ते सातत्याने आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2014 मध्ये पहिल्यांदा त्यांना हरियाणा सरकारमध्ये समाविष्ट करून कॅबिनेट मंत्री करण्यात आले. त्यांनी गृह विभाग, आयुष, आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा आणि युवक व्यवहार या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.