Nitin Gadkari On Dynastic Politics : घराणेशाहीवरून काँग्रेसला अनेकवेळा लक्ष्य गेले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने देखील त्यांच्या पक्षातील काही नेत्यांच्या मुलांना तिकिटे दिली आहेत. यावरच आता भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर परखड भाष्य केले आहे. या मुद्यावर काय म्हणाले आहेत गडकरी? पाहूया…
नितीन गडकरी यांनी एका प्रसिद्ध चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत यावर स्पष्ट भाष्य केले आहे. ते म्हणाले, “काही नेत्यांच्या मुलांना तिकीटे मिळवण्यासाठी भाजप हा उत्तम पर्याय वाटतो. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत.
यावर त्यांना पक्षात काही समस्या आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, योग्यता नसताना नेते जेव्हा त्यांच्या मुलांसाठी तिकीट मागतात, तेव्हा समस्या निर्माण होते.
ते म्हणाले, “मी कधीही घराणेशाहीचं राजकारण केलेलं नाही. माझ्या कुटुंबातील एकही सदस्य राजकारणात नाही. मी त्यांना सांगितले की माझ्या आई-वडिलांनी आणि मी जे काही कमावले ते त्यांचे आहे. पण माझ्या राजकीय वारशाचा हक्क हा माझ्या कार्यकर्त्यांना आहे”, असं नितीन गडकरी यांनी म्हंटले आहे.
आपला मुद्दा पुढे सरकवताना ते म्हणाले, “कोणत्या नेत्याचा मुलगा किंवा मुलगी राजकारण असणं हा गुन्हा नाही. पण जोपर्यंत तो त्याची योग्यता सिद्ध करत नाही, तोपर्यंत नेत्यांनी त्यांच्या मुलांसाठी तिकीट मागू नये. जर तो योग्य असेल आणि कार्यकर्त्यांचा त्याच्यावर विश्वास असेल, तर ते मुलासाठी तिकीट मागू शकतात. राजकारण गुणवत्ता असलेला व्यक्तीच पुढे जातो. पण केवळ राजकीय नेत्याचा मुलगा आहे, म्हणून त्याने राजकारण येऊ नये, असं म्हणणंही चुकीचं आहे. असं म्हणून आपण त्याचा हक्क हिरावून घेतो. ते योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.