Sanjay Raut : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत ते घर कोंबडा असल्याचे म्हंटले आहे. सांगलीच्या शिराळा रयत क्रांती कार्यालयाच्या उद्घाटनावेळी त्यांनी संजय राऊतांसह शरद पवारांवरही हल्लाबोल चढवला.
यावेळी ते म्हणाले, “संजय राऊत नावाचा ‘घर कोंबडा’ रोज एक आरोळी देतो. त्या कोंबड्याला मी सांगतो, की खुराड्यातून रोज बांग देऊ नकोस. तू एक पत्र लिहून दे… मनोज जरांगे पाटील यांना मी आणि ठाकरे गट मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करायला पाठिंबा देत आहे. बघूया कोंबड्या तुझ्यात जोर आहे का…,” अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
शरद पवारांवरही टीका
“महाराष्ट्राच्या राजकारणात आग लावण्याचे काम शरद पवार करत आहेत. हे मराठा समाजाने वेळीच ओळखले पाहिजे. सगळं दिल्यानंतर या राज्यात मराठा समाजात दुही माजवण्याचे काम केले जात आहे”, असा आरोप खोत यांनी यावेळी केला.
पुढे त्यांनी, रोहित पवार विद्वान माणूस आहे, महाराष्ट्रात आग लावत सुटलेत. भाडोत्री सोशल मीडिया महाराष्ट्रात ठेवली आहे का? तुम्ही लिहून द्या रोहित पवार की, मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश करायला या रोहित पवाराचा पाठिंबा आहे. महाराष्ट्रात आग लावायचे धंदे बंद करा. लोकसभेला जमलं म्हणून आता विधानसभेला जमेल ही भावना मनातून काढून टाका, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर देखील टीकास्त्र डागलं आहे.
पुढे त्यांनी राज्य सरकारच्या योजनांचा उल्लख करत महाविकास आघाडीवरही निशाणा साधला, महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर अनेक चांगले निर्णय घेतले गेले आहेत. अनेक योजना या सरकारने आणल्या आहेत. पण महाविकास आघाडीचे नेते सातत्याने टीका करतात. पण येणाऱ्या निवडणुकीत या महाविकास आघाडीतील वळू रेड्याना चाबकाने फोडून काढू, असं सदाभाऊ खोत यांनी म्हंटल आहे.