Ganesh Utsav 2024 : संपूर्ण महाराष्ट्रात आज गणपती विसर्जन (Ganpati) करण्यात येणार आहे. दहा दिवसांच्या गणपतीच्या आगमनाने महाराष्ट्रभर वातावरण प्रसन्न झाले होते परंतु आता गणपती बाप्पाला निरोप देताना सर्व गणेश भक्तांचे डोळे पाणावले आहेत. “गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…”असे बोलताना सर्व भाविकांचे कंठ दाटून येत आहेत. सर्वांच्या लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला जाणारअसून याच पार्श्वभूमीवर प्रशासन देखील गणेश विसर्जनासाठी सज्ज आहे.
लालबागचा राजा आणि तेजूकायाचा मंडळाकडून बाप्पाची उत्तर पूजा पार पडली असून विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आहे. या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर इतर मंडळातील गणपतीच्या विसर्जनाला देखील सुरुवात होते. मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील समुद्रकिनाऱ्यावर सर्व गणपतींचे विसर्जन केले जाते. यामुळेच या ठिकाणी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या गणपतीचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर केले जाते यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. तसेच पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीचा रथ सजवून तयार केला असून थोड्याच वेळात मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात आली असून 4 वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. या ठिकाणी देखील विसर्जन पाहण्यासाठी भावीक गर्दी करत असतात. अशा स्थितीत पुण्यातील पोलीस देखील मोठ्या तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, नांदेड जिल्हा प्रशासन देखील गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करत आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर 2 हजार 900 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नांदेड जिल्ह्यात तैनात करण्यात आला आहे. यासोबत गणेश विसर्जनासाठी 3 कृत्रिम तलाव आणि 26 मूर्ती संकलन केंद्र नांदेड जिल्ह्यात तयार केले गेले आहेत.