Pune Ganesh Visarjan 2024 : पुणेकर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. सर्वत्र बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. जरवर्षी प्रमाणे यंदाही मानाच्या आणि प्रमुख मंडळांनी विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशा पथक, बॅंड, ध्वजपथक या सगळ्या गोष्टींचे नियोजन पूर्ण झाले असून, मानाच्या गणपतीच्या मिरवणुकींना सुरुवात झाली आहे. तर सर्वांचा लाडका बाप्पा दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन साधारण संध्याकाळी ४ वाजता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
लाडक्या गणरायाला दिमाखदार मिरवणुकीने निरोप देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले असून, त्यासाठी जोरदार तयारी देखील केली. मानाच्या गणपतींसह सार्वजनिक गणेश मंडळांनी आकर्षक रथ, पालख्या आदींची सज्जता केली आहे. अनंत चतुर्दशीला मंगळवारी सकाळी १०.३० वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीला प्रारंभ झाला असून, सर्वप्रथम मानाचे पाच गणपती लक्ष्मी रस्त्यावरून मार्गस्थ होतील. आणि नंतर मंडळाचे गणपती असतील. यावर्षी मनाच्या गणपतींना कोणते आकर्षक रथ तयार करण्यात आले आहेत पाहूया.
कसबा गणपती
मनाचा पहिला कसबा गणपती मंडळाच्या गणपतीची मिरवणूक पारंपरिक चांदीच्या पालखीतून निघणार आहे. सकाळी १०.३० वाजता आरती झाल्यानंतर बेलबाग चौकातून मिरवणूक मार्गस्थ होणार आहे.
तांबडी जोगेश्वरी गणपती
दुसरा मनाचा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणरायाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून काढण्यात येणार आहे.
गुरुजी तालीम गणपती
तिसरा मनाचा गणपती, गुरुजी तालीम गणपतीची ‘सूर्य’ रथातून विसर्जन मिरवणूक निघणार आहे. रांगोळीच्या पायघड्या आणि गुलालाची उधळण करत गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला काहीच वेळात सुरुवात होणार आहे.
तुळशीबाग गणपती
मनाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाच्या गणेशाची मिरवणूक ३२ फूट उंची असलेल्या आणि आकर्षक फुलांनी सजवलेल्या ‘जगन्नाथ पुरी’ रथातून काढण्यात येणार आहे. जगन्नाथ रथाप्रमाणे कार्यकर्ते हा रथ ओढणार आहे.
केसरीवाडा गणपती
पाचवा मनाचा केसरीवाडा गणपती फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान होणार आहेत. विठ्ठलाची भव्य मूर्ती असलेला ‘माऊली’ रथ मिरवणुकीचे आकर्षण असणार आहे.
लाडका बाप्पा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट
आकर्षक विद्युत रोषणाई असलेल्या श्री उमांगमलज रथामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान होणार आहेत.