Arvind Kejriwal : आतिशी आता दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी (AAP) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. या निर्णयाला आता आमदारांनी देखील सहमती दर्शवली. आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. याआधी दिवंगत सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.
याआधी आम आदमी पक्षाच्या (आप) राजकीय घडामोडी समितीच्या (पीएसी) नेत्यांनी दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचे नाव सुचवले होते. सोमवारी (16 सप्टेंबर) पीएसीची बैठक झाली. त्यात आता हा निर्णय घेण्यात आला.
आतिशी यांच्याकडे केजरीवाल सरकारमध्ये सहा महत्त्वाची खाती आहेत. यामध्ये शिक्षण, महिला आणि बालविकास, पर्यटन आणि ऊर्जा मंत्रालयांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांचा रविवारी राजीनामा जाहीर
अरविंद केजरीवाल यांनी रविवारी (15 सप्टेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर संध्याकाळी ते लेफ्टनंट गव्हर्नर विनय सक्सेना यांची भेट घेऊन राजीनामा सादर करतील.
अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक केली होती. यानंतर त्यांना सीबीआयने अटक केली. सीबीआयच्या खटल्यात त्यांना १३ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. ईडीच्या खटल्यात त्यांना आधीच जामीन मिळाला होता. १३ सप्टेंबरला ते तिहार तुरुंगातून बाहेर आले.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी का घेतला हा निर्णय?
तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी रविवारी आप कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजीनाम्याची घोषणा केली. ते म्हणाले, ‘जोपर्यंत लोक त्यांना प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देत नाहीत, तोपर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाहीत.’
मुख्यमंत्री पदासाठी ‘या’ नावांची होती चर्चा
क्षाच्या अंतर्गत सूत्रांनी यापूर्वी सांगितले होते की, आतिशी यांच्याशिवाय दिल्लीचे मंत्री गोपाल राय, कैलाश गेहलोत आणि सौरभ भारद्वाज यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार म्हणून चर्चेत आहेत.