Ganesh Visarjan 2024 : गेल्या १० दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण भक्तिमय करून टाकणाऱ्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस असून, पुण्यातील प्रतिष्ठित मंडळांनी लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरात बाप्पांच्या मिरवणुकीसाठी ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, या मिरणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेश भक्तांना विसर्जन मिरवणूक लावकर आणि शांततेत पार पाडण्यासाठी आवाहन केले आहे.
नेहमीप्रमाणे यंदाही मानाच्या आणि प्रमुख मंडळांनी विसर्जन मिरवणुकांची जोरदार तयारी केली आहे. ढोल-ताशा पथक, बॅंड, ध्वजपथक या सगळ्या गोष्टींचे आयोजन केले आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील गणेश भक्तांना विसर्जन मिरवणूक लावकर आणि शांततेत पार पाडण्यासाठी आवाहन केले आहे. ते म्हणाले, ‘मला दगडूशेठ हलवाई मंडळातल्या सहकाऱ्यांनी सांगितले की त्यांचे विसर्जन साधारण संध्याकाळी ४ वाजता करण्याचे नियोजन केले आहे. तसे झाले आणि सर्व गणेश मूर्तींचं त्या-त्या दिवशीच विसर्जन झालं तर पोलीस, नागरिकांच्या दृष्टीनं ते बरं होतं.
नाहीतर ३६ तास मिरवणूक चालली तर पोलिसांवरही अतिरिक्त ताण येतो. सगळ्यांनी अशा उत्सवाच्या वेळी आपली कर्तव्य, बंधनांचे पालन केले पाहिजे . कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकार व पोलीस यंत्रणेवर असते. पण नागरिकांनीही त्यांच्यावरची बंधने पाळावीत. असे आवाहन अजितदादांनी पुण्यातील गणेश भक्तांना तसेच मंडळांना केले आहे.