विधानसभा निवडणुका (Vidhansabha Elections) तोंडावर आल्या आहेत. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकांच्या याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दगडूशेठ गणपतीची पूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आली. पूजा झाल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. राज्यात सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थना गणपती बाप्पाकडे अजित पवार यांनी केली. तसेच यावेळी बोलताना सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना मुख्यमंत्रिपद मिळावे असे वाटत असते. त्या सगळ्यांमध्ये मी देखील आलो. परंतु मुख्यमंत्री होण्यासाठी बहुमताचा आकडा गाठावा लागतो असे भाष्य अजित पवार यांनी केले आहे.
याचसोबत अजित पवार यांनी जागा वाटपाबद्दल भाष्य केले आहे. महायुतीचे सरकार आणणे आमचे पहिले टार्गेट आहे. जागा वाटपाचे काम सुरू असून काही ठिकाणी जर मार्ग निघाला नाही तर आम्ही सर्वजण बसून मार्ग काढू. महायुतीचे आम्ही सर्व घटक महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे वक्तव्य देखील अजित पवार यांनी केले आहे.
त्यासोबत गणेश विसर्जनाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले आहेत की, डीजेबाबत सीपी यांनी पत्रक काढले असून आपल्या उत्साहामुळे आणि डीजेच्या आवाजामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असे कृत्य कोणीही करु नये. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.