Eknath Shinde : राज्य सरकार मराठवाड्यातील जनतेच्या कायम पाठीशी उभे असून, दुष्काळग्रस्त मराठवाडा हा लागलेला कलंक पुसून टाकण्यासाठी सातत्याने कामे करत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे. गतवर्षी छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती. त्यात ४५ हजार कोटींच्या कामांची घोषणा करण्यात आली होती. आत्तापर्यंत सुमारे २९ हजार कोटींची कामे मार्गी लागली आहेत, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केला आहे.
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतिस्तंभ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मुख्यमंत्री संबोधित करत होते.
ते म्हणाले, “मागील वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 45 हजार कोटींच्या कामाची घोषणा केली होती. त्यात 29 हजार कोटींची काम पूर्ण झाली असून उर्वरित कामं अद्यापही सुरू आहेत. मराठवाड्यातील दुष्काळवाडा हा शब्द पुसण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, त्यासाठी वाहून जाणारं समुद्राचं पाणी गोदावरीला देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अनेक योजनांना निधी देण्यास आम्ही मागं पडणार नाही,” असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त केलं. “दोन वर्षात आम्ही वेगानं निर्णय घेतले आहेत, समृद्धी सारख्या महामार्गानं मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. अनेक नवीन उद्योग आणत आहोत, रोजगार निर्मिती त्यानिमित्तानं निर्माण होणार आहे. आयटी पार्क, इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती, अशा प्रकल्पाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. देशातील 52 टक्के उद्योग हे राज्यात असून त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय,” अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेबाबतही भाष्य केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही लाडकी बहीण योजना ही सर्वात यशस्वी योजना राबवत आहोत. त्याचबरोबर युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार निर्माण करत आहोत. दरम्यान, राज्यातील लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ दिली असून अडीच कोटी महिलांना मदत करण्याचं ध्येय आम्ही ठेवलं आहे. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांबाबतही भाष्य केले. सोयाबीनला पाच हजारांचा भाव देण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. असं ते म्हणाले आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी लाभदायी योजना राबवत असून कांद्याला देखील चांगला भाव मिळेल, यासाठी सरकार कठीबद्ध आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.