महाराष्ट्रात उत्साही वातावरणात आणि मोठया जल्लोषात गणेश विसर्जन (Ganesh Visarjan 2024) करण्यात येत आहे. दहा दिवसांच्या गणपती आगमनाने महाराष्ट्रातील संपूर्ण वातावरण प्रसन्न झाले होते. अनेक सार्वजनिक मंडळे तसेच घरगुती गणपती यांचे आज विसर्जन करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरच्या गणपतीचे देखील आज विसर्जन झाले. सागर बंगल्यावर बांधण्यात आलेल्या कृत्रिम हौदात गणेशाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता तसेच बुद्धीचा देवता देखील आहे. गणपती बाप्पाने आम्हाला सुबुद्धी द्यावी आणि ज्यांना सर्वात जास्त बुद्धीची गरज आहे त्यांना देखील गणपती बाप्पांनी सुबुद्धी द्यावी असे भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे.
भाजपचे नेते केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. मुंबईतील काँग्रेसचे बडे नेते अमीन पटेल यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत आहेत.
दरम्यान, आगामी निवडणुकीच्या चर्चेसाठी भाजपच्या अनेक नेत्यांची महत्त्वाची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पार पडली. दरम्यान, महायुतीच्या नेत्यांमध्ये जागावाटपाची बोलणी सुरु असून येत्या काही दिवसांमध्ये महायुतीकडून उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.