राज्यात मोठ्या जल्लोषात गणेश विसर्जनाचा (Ganpati Visarjan 2024) कार्यक्रम होत आहे. अनेक ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गणेशाची मिरवणूक काढण्यात येत आहे. असं असतानाच आता गणेश विसर्जनातील एक हृदयस्पर्शी आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरवणुकी दरम्यान ट्रॅक्टर खाली येऊन तीन लहान बालकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत सहाजण जखमी झाले आहेत.
धुळे (Dhule ) जिल्ह्यातील चितोड (Chitod) गावात हा प्रकार घडला आहे. एकलव्य श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने ट्रॅक्टरवर गणपतीची मिरवणूक काढली होती. यादरम्यान ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून समोर नाचत असणाऱ्या मिरवणुकीत हा ट्रॅक्टर शिरला आणि यामध्ये जागीच तीन लहान बालकांचा मृत्यू झाला आहे मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एक मुलगी 4 वर्षांची, एक 7 आणि एक 14 वर्षांची, अशा तीन मुली आहेत.
या घटनेत सहा जण जखमी झाले असून जखमींवर धुळेमधील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास धुळे पोलीस करत आहेत. या घटनेच्या प्राथमिक तपासातून ट्रॅक्टर चालकाने दारू प्यायली असल्याची माहिती समजली आहे.
दरम्यान, पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना गणेश विसर्जनादरम्यान वाहतूक अडथळा निर्माण होणार नाही तसेच मिरवणुकीदरम्यान कोणता अपघात होऊ नये याची काळजी घेण्यास सांगितली होती.