मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वपक्षातील काही नेत्यांची महामंडळांवर नियुक्ती केली असून शिवसेनेतील नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा देखील दिला आहे. यानंतर मुंबईमध्ये (Mumbai) बुधवारी अजित पवार (Ajit Pawar)यांच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. अजित पवार राष्ट्रवादी गटातील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे नाराज असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावलला जात आहे का ? असा प्रश्न प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला होता. यावर आपापल्या मतदारसंघांमध्ये जाऊन लोकांचा विश्वास मिळवला पाहिजे. आम्हाला सध्या लोकांपर्यंत जाऊन त्यांचे आशीर्वाद मिळवायचे आहेत. आमचे कुठलेही आमदार नाराज नाहीत अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिलेली आहे.
राष्ट्रवादी गोंदिया विधानसभेवर लढणार का ? असा प्रश्न देखील प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत की, महायुतीतून आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहोत. अद्याप तिन्ही पक्षांमध्ये कुठलीही अधिकृत चर्चा झालेली नाही. आमचे सरकार आले तर आम्ही लोकांना अजून चांगल्या योजना देऊ असे वक्तव्य त्यांनी यावेळी बोलताना केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची, गोंदिया भंडारा या ठिकाणी या महिन्याच्या शेवटी जनसन्मान यात्रा पार पडणार आहे. या जनसन्मान यात्रेविषयी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत की, राजकीय पक्ष म्हणून लोकांपर्यंत पोहचणे ही आमची जबाबदारी आहे म्हणून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जनसन्मान यात्रा काढण्यात येत आहेत.