Ganesh Visarjan 2024 : गेल्या १० दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण भक्तिमय करून टाकणाऱ्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस. आज अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर भाविक आपल्या बाप्पाला निरोप देत आहेत. आज सकाळपासूनच पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली असून, मानाच्या पाच गणपतीचे विर्सजन निर्विघ्न पार पडले आहे.
पहिल्या श्री कसबा गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे थाटात विसर्जन करण्यात आले. तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन 5 वाजून 12 मिनिटांनी करण्यात आले. तर पहिल्या मानाच्या गणपतीचे विसर्जन 4.35 मिनिटांनी झाले.
पाठोपाठ मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन झाले. सायंकाळी 6 वाजून 44 मिनिटांंनी तिसऱ्या मनाच्या गणपतीचे विसर्जन झाले. दरम्यान, पुण्याच्या मनाच्या चौथ्या श्री तुळशीबाग गणपतीचे ७ वाजून १ २ मिनिटांनी विसर्जन झाले.
पुण्यातील मानाच्या पाचव्या गणपतीचे म्हणजेच श्री केसरीवाडा गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन झाले. केसरीवाडा गणपतीचे ७ वाजून ३३ मिनिटांनी विसर्जन झाले. या विसर्जनानंतर पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मानाच्या गणपतींची मिरवणूक एकदम आकर्षक होती. गुलाबी झालेले सगळे कार्यकर्ते, ढोल ताशांचा जोरदार गजर तसेच नागरिकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. बाप्पाच्या मिरवणुकीला सगळे गणेशभक्त बाप्पाच्या भक्तीत नाचताना गणरायाला निरोप देताना दिसले.
यावर्षी मानाच्या बाप्पांचे विसर्जन मिरवणुकीचे रथ देखील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. यावर्षी पुण्यात कोरोनानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात भाविक गणपती पाहायला रस्त्यावर उतरले होते. फक्त पुण्यातलेच नाही तर पुण्याच्या बाहेरून देखील लोक गणपती पाहायला पुण्यात आले होते. दरम्यान, विसर्जन मिरवणुकांना देखील यावर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.