Pune ganpati visarjan 2024 : अजूनही पुण्यात गणपती विर्सजन मिरणूका सुरु आहेत, सलग २४ तासांपासून या मिरवणूक सुरु आहेत. टिळक रोड, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड वर अजूनही मिरवणुका चालूच आहेत. दरम्यान आज सकाळी अलका टॉकीज चौकात गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते व पोलिस यांच्यात बाचाबाची झाल्याची माहिती मिळत आहे.
एक सार्वजनिक मंडळ रोडवर एका जागी थांबून साउंड सिस्टीम लावत असल्याने पाठीमागून येणाऱ्या मंडळाची मोठी कोंडी झाली होती. यावेळी पोलिसांनी सांगून देखील संबंधित मंडळ पुढे जात नसल्याने यावेळी पोलिसांना आपल्या बाळाचा वापर करावा लागला, यामुळे मंडळ आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन वाद मिटवला त्यानंतर वाद थांबला आणि गणेश विसर्जन मिरवणूक पुढे सरकतण्यात आली आहे.
अलका टॉकीज चौकातील वादानंतर टिळक रोडवर देखील साउंड सिस्टीम वरुन वाद झाला. रात्री १२ नंतर सकाळी ६ वाजेपर्यंत साउंड सिस्टीम बंद ठेवली होती. मात्र, त्यानंतरही सकाळी सहा वाजता पोलिसांनी साउंड सिस्टीम मंडळांना सुरू करु दिली नाही या कारणावरून देखील पोलिस आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला इतर मार्गाने जाणा-या गणेश मंडळांना साउंड सिस्टीम लावण्यास परवानगी दिली होती. मात्र आम्हाला सिस्टीम लावण्यास विरोध का केला जात आहे. यावरून हा वाद झाला.
अशा स्थितीत गणेश मंडळांचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि कार्यकर्त्यांनी पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासाच्या समोरच ठिय्या आंदोलन केले. अखेर वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तसेच साउंड सिस्टीमवर गणपतीची आरती लावून त्यानंतर पुन्हा गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे. आता दोन्ही ठिकाणीचा वाद मिटला असून, गणेश विसर्जन मिरवणूका शांततेत पुन्हा सुरु झाल्या आहेत.