काही दिवसांपूर्वी राज्यात आनंददायी आणि उत्साही वातावरणात गणेशाचे (Ganpati) आगमन करण्यात आले होते. दहा दिवसांच्या गणपती आगमनाने संपूर्ण वातावरण तेजोमय झाले होते. काल गणेश विसर्जनाचा (Ganpati Visarjan 2024) कार्यक्रम देखील मोठ्या जल्लोषात सगळीकडे साजरा करण्यात आला. वाजत-गाजत गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक देखील अनेक ठिकाणी काढण्यात आली. मुंबई (Mumbai) पुणे (Pune ) यासारख्या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भाविकांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
मुंबईमधील लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षीच भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. यावर्षी देखील भाविकांनी दर्शन घेण्यासाठी रांगाच्या रांगा लावल्या होत्या. काल लालबागच्या राजाची आरती करण्यात आल्यानंतर विसर्जन मिरवणुकीस सुरुवात केली होती. तब्बल 23 तास ही मिरवणूक वाजत गाजत, जल्लोषात काढण्यात आली. दरवर्षी गिरगाव चौपाटीवर गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. यावर्षी गिरगाव चौपाटीवर पोहोचण्यासाठी लालबागच्या राजाला 23 तास लागले आहेत.
लालबागच्या राजाचे बुधवारी सकाळी 10.30 च्या सुमारास विसर्जन करण्यात आले आहे. गिरगावच्या चौपाटीवर सकाळी सहाच्या सुमारास लालबागच्या राजाला आणले गेले. तब्बल 23 तास लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू होती. गिरगाव चौपाटीवर पोहोचल्यानंतर हायड्रॉलिक्सचा वापर करून यांत्रिक तराफ्याच्या सहाय्याने लालबागच्या राजाचे खोल समुद्रात नेऊन विसर्जन करण्यात आले आहे.
लालबागच्या राजाला शेवटचे डोळे भरून पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. लालबागचा राजाला निरोप देताना सर्व गणेश भक्तांचे कंठ दाटून आले होते. लालबागच्या राजाचा विजय असो, ही शान कोणाची… लालबागच्या राजाची…. गणपती बाप्पा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या…..अशा घोषणा देत गणेश भक्तांनी यावेळी जल्लोष साजरा केला.
दरम्यान, तब्बल 23 तासानंतर लालबागच्या राजाला सर्व गणेशभक्तांकडून जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला आहे.