राज्यातील वरिष्ठ नेते एकनाथ खडसे(Eknath khadse)यांचा भाजपमध्ये पुनः प्रवेश हा राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी आता पुन्हा भाजपमध्ये सामील होण्याच्या इच्छेचे संकेत दिले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दलच्या बातम्यांमुळे आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण तापले आहे. खडसे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर टीका केली आहे, या दोघांमुळेच भाजपमध्ये प्रवेश रखडला असल्याचे खडसे यांनी सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर यांनी खडसे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले की, “स्वार्थासाठी कुणी किती पक्ष फिरवले तरी ते त्यांचे व्यक्तिगत प्रश्न आहेत, आम्हाला त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.”
चाकणकर यांनी खडसे यांच्यावर, “सूनेसाठी राजकारण झाले, आता लेकीच्या राजकारणासाठी खडसे नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहण्यास उत्सुक आहोत.” अश्या शब्दांत हल्लाबोल केला आहे. त्यांच्यासोबतच रोहिणी खडसे यांनाही चाकणकर यांनी लक्ष्य केले आणि खडसे कुटुंबाच्या राजकारणावर सवाल उपस्थित केला.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत महिलांसाठी आणलेली योजना अजित पवार यांनी प्रभावीपणे राबवली आहे, ज्यामुळे महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, असे चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांना लाडकी बहीण योजनेच्या धास्तीने टीका करण्याशिवाय काहीच नाही, असे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या आहेत.