Rahul Gandhi : अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका होत आहे, राजकीय वर्तुळातून सातत्याने त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या आमदाराने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जीभ कपणाऱ्याला 11 लाखांचे रोख बक्षीस दिले जाईल असे वक्तव्य केले होते तर आता भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनीही असेच काहीसे वक्तव्य केले आहे.
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटका दिला पाहिजे असे वक्तव्य केले आहे. बोंडे यांनी मंगळवारी अमरावती, महाराष्ट्र येथे हे वक्तव्य केले. त्यांनी यावेळी आमदार गायकवाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हंटले, आरक्षणाविरोधात राहुलजी जे बोलले ते धोकादायक आहे. राहुल गांधींची जीभ कापू नये, जिभेला चटका दिला पाहिजे.’
दरम्यान, अनिल बोंडे आणि संजय गायकवाड यांनी राहुल गांधींविरोधात केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत नसल्याचे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटले आहे. तथापि, त्यांनी गांधींना “भारतविरोधी विधाने” करणे टाळण्याचा सल्ला दिला आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे.
आरक्षणावर टीका करणाऱ्या राहुल गांधींची जीभ कपणाऱ्याला ११ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करून गायकवाड यांनी वादाला तोंड फोडले, तर बोंडे म्हणाले की, काँग्रेस नेत्याच्या जिभेला चटका दिला पाहिजे. या टिप्पण्यांवर प्रतिक्रिया विचारली असता बावनकुळे म्हणाले, “शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे राज्यसभा सदस्य अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचे मी समर्थन करत नाही. त्यांनी पुन्हा अशी विधाने करणे टाळावे. असे त्यांनी म्हंटले आहे.
आरक्षणाबाबत काय म्हणाले राहुल गांधी?
सध्या काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिकेचा दौरा करत आहेत यादरम्यान त्यांनी जॉर्जटाऊन विद्यापीठाला भेट दिले, तिथे विद्यार्थ्यांनी त्यांना आरक्षणाबाबत प्रश्न विचारला होता आणि विचारले होते की, हे किती दिवस सुरू राहणार? यावर राहुल गांधी म्हणाले, “जेव्हा भारतात (आरक्षणाच्या बाबतीत) निष्पक्षता येईल, तेव्हा आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू. यासाठी भारत सध्या योग्य ठिकाण नाही.” त्यांच्या याच वक्तव्यावरून राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.