Chandrayaan-4 and Gaganyaan Mission : आज केंद्रीय मंत्रिमंडळाने अंतराळाच्या दिशेने देशाच्या भक्कम पावलांच्या दरम्यान एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांना आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. व्हीनस ऑर्बिटर मिशन, गगनयान, चांद्रयान-4 मिशनच्या (Chandrayaan-4 ) विस्तारास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याचे ध्येय
भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परतण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने नवीन चंद्र मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. ‘चांद्रयान-4’ मिशन भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर (2040 पर्यंत) उतरवण्यासाठी आणि त्यांना पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणण्यासाठी मूलभूत तंत्रज्ञान विकसित करेल, असे एका निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, चांद्रयान-4 मोहिमेच्या तंत्रज्ञान प्रात्यक्षिकासाठी एकूण 2,104.06 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ही मोहीम मान्यतेनंतर 36 महिन्यांत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या सहभागाने पूर्ण केली जाईल. तसेच यासंबंधीचे सर्व महत्त्वाचे तंत्रज्ञान स्वदेशी पद्धतीने विकसित करण्याची संकल्पना असल्याचे या निवेदनात सांगण्यात आले आहे.
चंद्रावरचे खडक आणि माती पृथ्वीवर आणली जाईल
मंत्रिमंडळाने चांद्रयान-4 मिशनला मंजुरी दिली, ज्या अंतर्गत चंद्राचे खडक आणि माती पृथ्वीवर आणली जाईल. यासोबतच मंत्रिमंडळाने जड वजन वाहून नेण्यास सक्षम असलेल्या नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेइकलला मंजुरी दिली.
सरकारने व्हीनस ऑर्बिटर मिशन आणि भारतीय अंतराळ स्थानकाच्या योजनांनाही मंजुरी दिली आहे. यात भविष्यातील मोहिमा पार पाडण्यासाठी नवीन पिढीच्या प्रक्षेपण वाहनाला मान्यता देण्यात आली आहे, ज्याची रचना पृथ्वीच्या निम्न कक्षेत जास्तीत जास्त 30 टन पेलोड वाहून नेण्यासाठी केली आहे.
चांद्रयान-4 साठी 2,104 कोटी रुपयांची तरतूद
चांद्रयान-3 च्या यशानंतर मोदी सरकारने 36 महिन्यांच्या मिशन टाइमलाइनसह चांद्रयान-4 साठी 2,104 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या मोहिमेमध्ये प्रत्येकी पाच मॉड्युल असलेले दोन अंतराळयान स्टॅक असतील. स्टॅक 1 चंद्राच्या नमुना संकलनावर लक्ष केंद्रित करेल, तर स्टॅक 2 पृथ्वीवर ते नमुने आणेल.