Tirupati Balaji : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांच्याकडून एक धक्कादायक दावा केला जात आहे, त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी बुधवारी मागील वायएसआर काँग्रेस सरकारवर (Yuvajana Sramika Rythu Congress Party) आपल्या कार्यकाळात प्रसिद्ध तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरल्याचा आरोप केला आहे.
चंद्राबाबू नायडू यावर बोलताना म्हणाले की, ‘तिरुपती प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचे जाणून आश्चर्य वाटले. करोडो भाविकांच्या धार्मिक भावनांचा आदर न करू शकलेल्यांना लाज वाटली पाहिजे.’ अशा शब्दात त्यांनी तोंडसुख घेतले.
प्रसिद्ध तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रसाद म्हणून लाडू दिले जातात. दरम्यान, ‘चंद्राबाबू नायडू यांनी एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत संबोधित करताना हा दावा केला. त्यानंतर ते म्हणाले, ‘मात्र, आता शुद्ध तुपाचा वापर केला जात असून प्रसादाची गुणवत्ता सुधारली आहे.”
दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांच्या या आरोपांवर वाईएसआर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, तिरुपती मंदिराच्या पावित्र्याला धक्का पोहोचवल्याचा आरोप नायडूंवर केला आहे. जगनमोहन रेड्डी यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर लिहिले की, “चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला आणि करोडो हिंदूंच्या श्रद्धेला, दुखावले आहे. तिरुमला प्रसादाबद्दल त्यांनी केलेल्या टिप्पण्या अत्यंत दुर्भावनापूर्ण आहेत. कोणत्याही व्यक्तीने असे शब्द बोलू नये किंवा असे आरोप करू नयेत.”
ते पुढे म्हणाले, “राजकीय फायद्यासाठी चंद्राबाबू नायडू कोणत्याही थराला जाऊ शकतात हे पुन्हा सिद्ध झाले आहे. भक्तांचा विश्वास दृढ करण्यासाठी मी माझ्या कुटुंबासह शपथ घ्यायला तयार आहे. चंद्राबाबू नायडू आपल्या कुटुंबासोबत शपत घेण्यास तयार आहेत का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
चंद्राबाबू नायडू नेमकं काय म्हणाले?
तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंवरुन मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी वाईएसआर काँग्रेस गंभीर आरोप केले. पवित्र लाडवात शुद्ध तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर करण्यात आला असल्याचे त्यांनी म्हंटले. मात्र, आता शुद्ध तुपाचा वापर केला जात असल्याचंही चंद्राबाबूंनी यांनी स्पष्ट केलं आहे. मंदिरातील सर्व काही स्वच्छ करण्यात आले आहे. यामुळे गुणवत्ता सुधारली आहे, असंही त्यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत स्पष्ट केले आहे.